दसरा : रीत भात आणि आपण

दसरा :

दसरा हा साडेतिन मुहुर्तातील एक मुहुर्त मानला जातो. दसरा म्हटलं की आपल्याला नविन कपडे पुरणपोळीच जेवण आणि पतंगांची उधळण या गोष्टी पटकन आठवतात. प्रत्येक ठिकाणी हा सण साजरा करण्याची पद्धत मात्र वेगळी दिसते. मराठवाड्यातील कांही भागात आजही सिमोलंघ्घन केल जात. देवीच्या मंदिरातजाऊन सोन (आपट्याच्या झाडाची पाने व सौंदडीच्या  (शमीवृक्ष) / समदडीच्या झाडाची पाने यालाच या दिवशी सोन म्हणतात.) दिलं व घेतल जात.  सिमोल्लंघन करुन आल्यानंतर घरातील बायका पुरुषांना ओवाळतात व घरातील लहान मंडळी मोठ्यांना सोन देऊन त्यांचे आशीर्वाद घेतात. सोन दिल्यानंतर कडकणी खायला देण्याची पद्धत अनेक ठिकाणी दिसते. (मराठवाड्यात) हे या दिवशीच्या खाद्यपदार्थाचे वेगळेपण दिसते.

        कडकणी हा प्रकार या दिवशीचा विशेष खाद्यपदार्थ. देवासमोर देवघराला कडकण्या दोरीत ओवुन बांधल्या जातात. त्यात आरसा, फणी, बांगड्या, जोडवे, आणि पाच कडकण्या अस केलेलं असतं. आता म्हणालं ही सौंदर्यप्रसाधने कशासाठी तर तीही कडकण्याच्या पिठाचीच केलेली असतात. सिमोलंघ्घन करुन आल्यानंतर देवाला सोन द्यायचं आणि त्याच्या जवळची एक कडकणी मोडुण घ्यायची. अशी पद्धत आहे. आता या रीतीभाती बऱ्याच ठिकाणी मोडीत निघालेल्या असल्यातरी ग्रामीण भागामध्ये ही पद्धत आजही दिसते.

कडकणी करण्याची पद्धती : गव्हाचे पिठ, त्यात चवीनुसार मिठ, थोडी हळद (केवळ रंग चांगला यावा म्हणुन) गुळ बारीक करुन टाकायचे आणि पिठ मळुन घ्यायचे. अर्धातास नंतर त्यापिठाच्या बारीक पातळ  पुऱ्यांच्या आकाराच्या लाट्या लाटायच्या त्याकडक तळुन घ्यायच्या. (याच पिठाच्या बांगड्या, आरसा, जोडवे, फणी करायची आणि तळुन घ्यायची.)

दसरा म्हटलं की घरांची स्वच्छता आली. त्यात या दिवशी इळे, खुरपे, उकरी, कुदळ, कुऱ्हाड, चिपट, मापट, आदली, पायली, तराजु यांना स्वच्छ धुवुन त्यांची पुजा केली जाते. हे मात्र या दिवसांच वेगळेपण अधिक आधोरेखित होणारे आहे. आपण बऱ्याचवेळा पुस्तकांची आपल्याजवळील वाहनांची पुजा करताना आपण पहातो परंतु ग्रामीण भागामध्ये दसऱ्या दिवशी शेतीला पुरक अशी उपकरणे यांची पुजा केली जाते. तसेच दाराला आंब्याच्या पानांच तोरण, झेंडुंच्या फुलांच्या माळा लावल्या जातात.

परड्या, कोटंब भरलं जातं. शेतातल्या सगळ्या देवांना आठवणीने निवद दाखवला जातो. निवदामध्ये कडकणी आठवणीने असते. यात आसरा - मसोबाला शेंदुर लावुन निवद दाखवायचा. पांडवाला चुन्नालावुन निवद दाखवायचा. आता तुम्हाला वाटेल हे पांडव कोण. तर येळअमावस्येच्या वेळी आपण जे देव पुजतो. (दगडाचे पाच पांडव) त्याला पांडव म्हणतात. प्रत्येक सणावाराला त्या देवाला निवद हा दाखवावा लागतो. हे सगळे रीतीरिवाज करता करता. पुरण पोळीचा स्वयंपाक मात्र आठवणीने करावा लागतो. पुरणपोळी नाही तर तो सण कसला.

Comments

  1. नवी माहिती मिळाली. धन्यवाद. उत्तम लेख.

    ReplyDelete
  2. सुंदर लिखाण आणि योएग्य वर्णन

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts