येळवस



कृषीसंस्कृती : येळवस
वेळअमावस्या, येळवस हा मराठी महिन्यानुसार मार्गशीर्ष महिण्याच्या शेवटची आमवस्या, पुस महिण्याची सुरवात होण्या अगोदरचा सण. हा सण शेतकऱ्याच्या जगण्याशी, कृषीसंस्कृतीशी जोडलेला आहे. (आदल्या) अगोदरच्या दिवशी भाजी पाल्याचा बाजार असतो. त्यादिवशी येळवशीसाठी लागणारे भाज्या, फळ आता बाजारात मिळत आहेत. पुर्वी शेतातुन तुरीच्या शेंगा, हरभऱ्याचे ढाळे, चिंचा, लसणाची पात, कांद्याची पात, वटाण्याच्या शेंगा, वरण्याच्या (वालच्या) शेंगा, कोथींबीर, मेथाची भाजी, अदरक,वांगे, गाजर या सर्व भाज्यांची जंत्री केली जाते आणि ते सर्व साहित्य स्वयंपाकासाठी वातरण्यात येते. रात्रभर स्वयंपाक केला जातो.
सकाळी लवकर शेताकडे जाण्यासाठी आंबलीची बिंदगी डोक्यावर घेऊन घरातील कर्ता शेताकडे निघतो. (पाठीवर घोंगड्याचा घोंगता करुन, डोक्यावर आंबलीची बिंदगी घेतली जाते.) एकदा आंबलीच बिंदग डोक्यावर घेतल की, परत पाठिमागे फिरून (वळुन) पहायचे नसते. शेतात गेल्यानंतर आंबलीच बिंदग कोपीत ठेवल जात. डोक्यावर डाल, टोपल घेऊन बायका, घरातील सर्व लोक शेतात येतात.
पुजाविधी :
शेतात एका झाडाखाली कडब्याच्या पाच पेंड्यापासुन कोप (खोप) तयार केली जाते. त्याला लालरंगाचा कपडा बांधला जातो. कोपीला बाहेरच्या बाजुने ऊस उभा केला जातो. त्या कोपीत सहा दगड पांडव म्हणुन चुना लावुन ठेवले जातात, मातीचे पाच टाक लक्ष्मी म्हणुन मांडले जातात, त्यालाही चुन्याने रंगवले जाते. त्याच्या समोर एरंडीचे पान अंथरून त्यावर नैवद्य (निवद, दिवे, भात, भजी, शेंदाण्याचे लाडु, गुळाचे उंडे, केळी, जांभ, असे सर्व पदार्थ), ओटीच (हिरवा कपडा, तांदुळ, खायची पान (नागवेलीची पान), सुपारी, हळदीच खोंब, खोबर, खडीसाखर, बदाम असे साहित्य) साहित्य ठेवले जातात.
नैवेद्य म्हणुन छोटे निवद, त्यावर दिवे, उंडा, भज्जी, शेंगदाण्याचे लाडू, आंबील, आंबटभात ठेवले जातात. पांडवाची पुजाअर्चा केली जाते. ही पूजा होत असताना मात्र न कोणती आरती म्हटली जाते न कोणता मंत्रोच्चार केला जातो, दोन वाट्या घेऊन एकात पाणी आणि एकात आंबील, भज्जी, आंबटभात, खीर याचे मिश्रण केले जाते. ते दोघांना दिले जाते. ते दोघांनी शेतातील ज्वारीच्या पानाच्या सहाय्याने सर्वत्र शिंपत कोपीच्या भोवती व शेतात फिरायचे. यालाच 'चर शिंपने' असे म्हणतात. चर शिपतेवेळी “हर हर महाssदेव.....पाऊस आला घरला पळा !!!” चा गजर केला जातो. असे म्हणत चर शिपत असताना एक जण ताटली चमच्याने वाजवत असतो. व हरहर महादेव ... (कर्नाटक सीमेवरील व भागात मात्र ‘हर हर महादेव’ ऐवजी ‘ओलगे ओलगे सालम पोलगे, पाची पांडव सहावी द्रौपदी..... हर हर महादेव...हर भगत राजोss हारभलंss..!!! ) च्या गजरात पुजा संपन्न होते. गुडघ्यावर बसून पांडवाला नमस्कार केला जातो आणि त्याच स्थितीत पाठीमागे उजवा हात करून त्या हातात मग एक गुळाचा उंडा ठेवला जातो.(कांही ठिकाणी सजगुऱ्याचा उंडा पाठित मारला जातो.) आसरा, म्हसोबा, पाण्यातला देव, पुर्वज व इतर देवानाही नैवेद्य दाखवून नारळ फोडले जाते. या पुजेची सुरीवात म्हसोबाला नारळ फोडुन होते.
पूजाविधी झाल्यानंतर लगेच जेवणाची पंगत बसते. यात रात्री केलेल्या सर्वच पदार्थांचे आनंदाने सेवन केले जाते. या वनभोजनाची मज्जा काही औरच असते! शेजारी पाजारी, मित्रवर्ग, सगेसोयरे यांना आग्रहाचे आमंत्रण देऊन एकत्रित जेवण केले जाते. एखादा अनोळखी व्यक्ती जरी जवळून बांधाने जात असेल तर त्यालाही आवर्जून बोलावले जाते... जेवण शक्य नसेल तर किमान आंबील तरी प्या हा आग्रह केला जातो.
संध्याकाळी छोट्या मटक्यात (यालाच बोळी असही म्हटल जात.) दूध आणि शेवाया शिजवल्या जातात. त्याला उतू दवडणे असे म्हणतात. ते उतू ज्या दिशेला उतू जाईल त्या दिशेला पुढील वर्षी चांगले पिक येईल असा समज असतो. थोड्या वेळात पेंढ्या पेटवल्या जातात. त्या पेटत्या पेंढ्या घेऊन पिकाच्या भोवती शेताला प्रदक्षिणा घातली जाते. यामुळे पिकांवर कसल्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही असा समज असतो. काही ठिकाणी त्या पेंढ्या तशाच पेटत्या ठेऊन गावात आणले जाते आणि मारुतीच्या मंदिराला एक फेरी मारून मंदिरासमोर टाकले जाते. त्यात ऊस ही भाजुन खालला जातो. ज्यांची शेतं दूर आहेत असे शेतकरी इथेच पेंढ्या पेटवतात आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून तिथेच मंदिरासमोर टाकतात. शेतातली सर्व मंडळी सूर्यास्ताच्या वेळी दिवसभरात हा अनोखा आनंदोत्सव साजरा करून सुखासमाधानाने घरी येतात.
स्वयंपाक :
वेळामवस्याच्या आदल्या दिवशी रात्री स्वयंपाक केला जातो. यात प्रांता नुसार कांही ठिकाणी उंडे तर कांही ठिकाणी भाकरी केल्या जातात. भाकरीला आजच्या दिवशी भाकर न म्हणता ‘रोडगा’ म्हटलं जातं. त्याचबरोबर रानातल्या सर्व पालेभाज्या एकत्र करून भाज्यांची मोकळी भजी, पातळ भज्जी, खीर, आंबील, आंबटभात, भात, सपक वरण, गुळाचे उंडे, तिळ व शेंगदाणे एकत्र करून त्याच्या भाकरी / पोळ्या केल्या जातात. यालाच कोंदीच्या भाकरी असेही म्हणतात. सजगुरऱ्याचे (बाजरीचे) व ज्वारीचे उंडे, भाकरी, शेंगदाण्याचे लाडू, गव्हाची खीर, आंबिल इ. असा सर्व स्वयंपाक रात्रभर केला जातो. व सकाळी सकाळी डोक्यावर बिंदगी घेऊन शेतकरी शेतात कोपीची पुजा करण्यासाठी जातो. त्याच्या पाठोपाठ त्याची मालकीन डोक्यावर डाल घेऊन सर्व स्वयंपाक त्यात भरून शेतात जाऊन कोपीची पुजा करतात.
या सणाची सर्व तयारी आदल्याच दिवशी दिवसभर व रात्रभर केली जाते. यात बाजारातुन, शेतातुन आवश्यक ते साहित्य आणणे, ते निट निसुन ठेवणे. कुंभाराकडुन सांजमोरव आणणे, सांजमोरव्यालाच कर्नाटकात ‘आळंदं’ असे म्हणतात. आता हे सांजमोरव / 'आळंदं' म्हणजे काय, तर सांजमोरव / ‘आळंदं’ म्हणजे एक लहान बिंदगी (कळशी एवढी मातीची बिंदगी) व छोट लोटक (एकदम लहान आकाराचे (तांब्या एवढ) मडक) आणि त्यावर झाकायला दोन येळणी (खापराची प्लेट), या ‘बिंदगीत’ सकाळी घरातला कर्ता पुरूष आंबील भरून डोक्यावर घेऊन शेतातकडे जातो. ही बिंदगी घेऊन जाताना मात्र पाठीमागे वळायचे नाही, हा शिरस्ता आहे.
या सणाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्या वर्षाच्या सर्व सणांमध्ये वेळामावास्या हा एकमेव सण असा आहे की, या सणाचा स्वयंपाक हा आदल्यादिवशी केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर आनंदाने खाल्ला जातो. लोकांना जेवायला बोलवले जाते, आपणही दिवसात कितीही वेळा जेवणे. जेवण केल्यानंतर आंबिल पिणे. काहीजण तर आंबील आणि तत्सम पदार्थ एकत्र करून खातात. यालाच आंबुर म्हणतात.
सर्व सणापेक्षा एकदम वेगळा आणि कृषीसंस्कृतीत खास असणारा हा सण ! आमच्यासाठी मात्र सर्व सणाला भारी पडणारा हा सण असतो.
अप्रतिम माहितीपूर्ण लेख.. अभिनंदन..
ReplyDeleteधन्यवाद
Delete