हदगा
हदगा
हदगा या झाडाच्या फुलांचा उपयोग व माहिती -
यालाच आयुर्वेदात अगस्त्य वनस्पती असे म्हणतात.
विदर्भात हेटी / हेटा असे म्हतात.
तर याचे शास्त्रीय नाव- sesbania grandiflora (सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा) आहे.
कूळ - Fabaceae (फॅबेसी)
हादग्याच्या लहान वृक्षांची लागवड मंदिर परिसरात, तसेच शेतात बांधावर करतात. हादग्याचा वृक्ष ३० फुटांपर्यंत सरळसोट वाढतो. हा वृक्ष जलद वाढतो, पण त्याचे आयुष्यमान कमी असते. खोड व फांद्या नाजूक व ठिसूळ असतात. फांद्या खोडाच्या वरील भागात, पसरणाऱ्या व खाली झुकलेल्या असतात.
हादगा इतका आपला झाला आहे कि अनेकांना माहित नाही तो विदेशी आहे. ( संदर्भ - प्रा. श्रीधर द. महाजन सरांच्या विदेशी वृक्ष पुस्तकातील पान नं 126.)
हादग्याची पाने –
संयुक्त, एकाआड एक, १५ ते ३० सें. मी. लांब. पर्णिकेच्या १० ते ३० जोड्या.
फुले - लंबगोलाकार आकारांनी मोठी, अनियमित, द्विलिंगी, पांढरी, पिवळट-पांढरी किंवा लालसर रंगाची, पानांच्या बेचक्यातून येणाऱ्या लहान पुष्पमंजिरीत येतात. पुष्पकोश ५ संयुक्त दलांनी बनवलेला. पाकळ्या ५, असमान व अनियमित. मोठी पाकळी ६ ते १० सें. मी. लांब, दोन पाकळ्या मध्यम आकाराच्या व दोन पाकळ्या लहान, तळाशी साधारण चिकटलेली. पुंकेसर १०, एकमेकांस चिकटून दोन पुंकेसर नलिका तयार होतात. बीजांडकोष लांब, गोलाकार, चपटा, एककप्पी.
शेंगा -
शेंग फूट ते दिड फूट लांब, चारकोनी. एका शेंगेत २० ते २५ बिया, तपकिरी रंगाच्या असतात. हादग्याला सप्टेंबर ते जानेवारी महिन्यात फुले व शेंगा येतात. फुलांची व कोवळ्या शेंगांची भाजी करतात.
औषधी उपयोग -
हादग्याच्या खोडाची साल, पाने व मूळ औषधात वापरतात. साल फार ग्राही आहे. पाने आनुलोमिक व शिरोविरेचन आहेत. मूळ उष्णवीर्य, वातहर, कफघ्न व शोथघ्न आहे. फुले दीपन व आनुलोमिक आहेत.
अनार्तवांत फुलांची भाजी उपयुक्त आहे. फुफ्फुस सुजून ज्वर, कफ ही चिन्हे असतात, अशा वेळी हादग्याच्या मुळाची साल विड्याच्या पानातून किंवा तिचा अंगरस मधाबरोबर देतात, त्यानंतर घाम येतो व कफ पडावयास लागतो.
पाने ठेचून व्रणावर बांधल्यास त्याची शुद्धी व रोपण होते.
ज्वर, डोळेदुखी, धुंदी यामध्ये पानांच्या रसाचे नस्य करतात. त्याने पुष्कळ पाणी वाहते. ठेचाळलेल्या भागावर पानांचा लेप करतात.
जुन्या सर्दीत किंवा अर्धशिशी मधे,याच्या पानाचा रस आळीपाळीने एकेका नाकपुडीत 2/2 थेंब रस टाकावा. त्यापूर्वी डोके कॉटच्या
कडेला खाली लोंबकळत ठेवावे आणि मग नाकपुडीत रस टाकावा. सर्दी / अर्धशिशी लगेच गायब होते.
नेत्र विकारांमध्ये उपयुक्त.
केल्शियमचा मोठा स्त्रोत.
व्यायलेल्या जनावरांच्या कासेवर सुज असेल तर ह्याचा पाला लेप करुन लावतात.
ह्याच्या फुलां मध्ये विटामिन सी व बी असते तसेच प्रोटीन भरपुर मात्रा मध्ये आहेत.
भरपूर अ जीवन सत्व असते. ‘अ’ या जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा निर्माण होतो. यामध्ये रोग्यास संध्याकाळ झाली की
दिसावयाचे पूर्णपणे बंद होते, अशा वेळी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रुग्णाचा त्रास कमी होतो.
फुलांची भाजी सकाल सायंकाल खलल्यास रातांधले पणा जातो.
पाना व साल ह्यांचा ही औषधीय उपयोग आहे.
दृष्टी कमी झाल्यास फुलांचा रस डोळ्यात घालतात. संधिशोथात मुळाचा लेप करतात.
हादग्याची फुले चवीला थोडी कडवट, तुरट असतात. त्याचा पाक तिखट असतो. फुले गुणाने थंड आहेत, त्यामुळे त्रिदोषांपैकी
वातदोष कमी होण्याकरिता, तसेच कफ व पित्तदोषही साम्यावस्येत आणण्यासाठी हादग्याच्या फुलांच्या भाजीचा चांगला उपयोग
होतो.
चार-चार दिवसांनी थंडी वाजून येणाऱ्याच तापावर हादग्याच्या फुलांची भाजी उपयुक्त आहे.
वरचेवर होणाऱ्या सर्दीचा त्रास या भाजीच्या तिखट गुणधर्माने कमी होतो.
भूक लागत नसल्यास, पोट साफ होत नसल्यासही हादग्याच्या भाजीने चांगला गुण येतो.
ज्या स्त्रियांची पाळी अनियमित होते, अंगावरून कमी जाते, पाळीच्या दिवसांत कंबर, ओटीपोटी दुखते अशा तक्रारी या भाजीच्या
सेवनाने कमी होतात.
उपयोग
१) फुलांची चण्याचं पीठ घालून भाजी छान होते. तव्यात बनवलेल्या फुलांच्या भाजीची टेस्ट अमेझिंग.
२) फुलांची चटणी केली जाते.
३) भाजी आणि भजी पण करतात.
४) भाजी, कोशिंबीर करतात.
५) कांदा घालून याची भाजी खूप छान होते.
६) फुलातील s आकाराचा पुकेशर काढून मग भाजी करावी अन्यथा कडू होते .
७) हेट्या ची फुल ह्या चा ऊपयोग ढोराना चारा आनी फूलाची भाजी म्हणूण वापर होतो.
८) हरभरा डाळ घालून ही भाजी करतात , ही भाजी खिम्या सारखी लागते.
९) अगस्तीची फुले पितरांच्या कार्यात प्रिय.
१०) याच्या कोवळ्या शेंगांची पण भाजी करतात.
पाककृती
हादगा फुलांची भाजी – ३ प्रकारे केली जाते. प्रांत बदलला की भाजी करण्याची पद्धतीही बदलते.
१) साहित्य - हादग्याची फुले, कांदा, लसूण, ओली मिरची, हिंग, जिरे, तेल इ.
कृती - फुले स्वच्छ धुऊन, त्यातील स्त्रीकेशर काढुण मगच फुले चिरून घ्यावीत. कढईत तेल घेऊन चिरलेला कांदा त्यात भाजून घ्यावा. नंतर त्यामध्ये लसूण, जिरे किंवा जिरे पावडर, ओली मिरची घालून परतणे आणि नंतर चिरलेली भाजी घालून परतणे व शिजवून घ्यावी.
२) साहित्य - हादग्याची फुले, भिजवलेली मूगडाळ, कांदा, तेल, फोडणीचे साहित्य, मीठ, गूळ, तिखट, भाजलेले खोबरे व खसखस इ.
कृती - फुले स्वच्छ धुऊन स्त्रीकेशर काढुण ती बारीक चिरावीत. फोडणीत भिजवलेली मूगडाळ, चिरलेला कांदा चांगला परतून घ्यावा. नंतर त्यावर चिरलेली फुलं टाकून परतावीत. शिजत आल्यानंतर मीठ, गूळ, तिखट, खोबरे घालून तीन-चार वाफा आणाव्यात. कांदा आवडीनुसार घालावा. तयार झालेल्या भाजीत भाजलेले खोबरे व थोडी भाजलेली खसखस घालावी. हीच भाजी शिजवल्यानंतर वरून थोडे डाळीचे पीठ लावून परतूनही तयार करतात.
३) साहित्य - हादग्याची फुले, तेल, फोडणीचे साहित्य, शेंगदाण्याचे पीठ (कुट) मीठ, तिखट इ.
कृती - फुले स्वच्छ धुऊन स्त्रीकेशर काढुण, फुलांच्या मागील हिरवा दांडा काढुण टाकावा व निव्वळ फुलांच्या पाकळ्याच भाजी करतेवेळी घ्याव्यात ती बारीक चिरावीत. ती उकडुन किंवा भाजुन घ्यावीत. त्यानंतर तव्यात तेल टाकावे, त्यात जिरे, मोहरी टाकावी. त्यात भाजलेली किंवा उकडलेली फुले टाकावी, त्यात शेंगदाण्याचे पीठ (कुट), लाल तिखट, मीठ टाकुन भाजीला सर्व साहित्य मिसळेल अशा पद्धतीने भाजी मिसळावी. थोडीवेळ तशीच तव्यावर ठेवावी. भाजी खरपुस होईपर्यंत तशीच शिजवावी.
फुलांचे भरीत –
१) साहित्य - हादग्याची फुले, दही, मीठ, साखर, हिरवी मिरची, कोथिंबीर, तूप, जिरे इ.
कृती - प्रथम फुले चिरून उकडून घ्यावीत. फुलांमध्ये मीठ, साखर घालावी व वरून फोडणी द्यावी. फोडणीत मिरची तुकडे घालावेत.
फुलांच्या देठाचे सांडगे -
१) साहित्य - हादग्याच्या फुलांचे देठ, दही, धने-जिरपूड, मीठ इ.
कृती - हादग्याच्या फुलांचे देठ काढावेत. या देठांचे सांडगे छान होतात. आंबट दह्यात धने- जिरेपूड व मीठ घालून ते चांगले कालवावेत व त्यात देठे बुडवून ती उन्हात वाळवावीत. पुन्हा दोन दिवसांनी तशीच दोन वेळा पुढे घ्यावीत व ती कडक वाळवून तळण्यासाठी वापरावीत. फुलांची भजीही करतात.
शेंगांची भाजी -
१) साहित्य - हादग्याच्या कोवळ्या शेंगा, चिरलेला कांदा, तेल, मीठ, तिखट, ओले खोबरे, कोथिंबीर इ.
कृती - कोवळ्या शेंगांचे लहान तुकडे करावेत. ते नीट निवडावेत. कढईत तेल घेऊन त्यात चिरलेला कांदा चांगला भाजून घ्यावा. निवडलेल्या शेंगांचे तुकडे, मीठ, तिखट घालावे व परतावेत. आवश्यकतेप्रमाणे पाणी घालवून शिजवावे. गरज वाटल्यास मसाला घालावा. भाजी तयार झाल्यानंतर त्यावर किसलेले ओले खोबरे व कोथिंबीर घालावी.
संदर्भ –
अग्रोवन, सकाळ,
विकासपीडीया वरील डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या लेखाचा आधार घेऊन माहितीत भर घालुन माहिती लिहिली आहे.
Comments
Post a Comment