लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी
लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी (२१ सप्टेंबर १९३९)
मराठवाड्यातील कवी, कथाकार, कादंबरीकार. जन्म जिंतूर, जिल्हा परभणी येथे झाला. शालेय शिक्षण जिंतूर येथे. महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबाद येथे. एम.ए. (मराठी) मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे प्रथमश्रेणीत उत्तीर्ण. वाड्.मयीन जडणघडणीवर ग्रामीण परिसर व तेथले प्रश्न, वास्तव यांच्या अनुभवातून साहित्य लेखनाची वाटचाल.
नोकरीची वाटचाल माध्यमिक शिक्षकापासून, (१९६०-६१) एडेड स्कूल, पूर्णा येथे काम केले. (१९६१-६२) माध्यमिक शिक्षक सरस्वती भूवन, औरंगाबाद. (१९६२-६३) श्री गुजरात विद्या मंदिर, औरंगाबाद. (१९६३ -९९) देगलूर महाविद्यालय, देगलूर येथे अधिव्याख्याता म्हणून काम केले व प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले.
‘हुंकार’ (१९५९), हा पहिला कवितासंग्रह. ‘अस्वस्थ सूर्यास्त’ (१९७०), ‘मी धात्री मी धरित्री’ (१९९१), ‘गोकुळवाटा’ (२००४), ‘जन्मझुला’ (२०१३), हे काव्यसंग्रह. ‘हुंकार’ या कवितांमधून व्यक्तीकडून समष्टीकडे जाण्याचा प्रयत्न आहे. दु:खाची अनंत रूपे आहेत. दु:खाची जाण, दांभिकतेची चीड, बेगडीपणाबद्दल तिटकारा आणि तिरस्कार कवितेत व्यक्त होतो. ‘अस्वस्थ सूर्यास्त’ या कविता संग्रहातील कविता रितेपणा, वेदना, कालखंडाचे नेमके व नेटके वर्णन, स्वत: बरोबरच निसर्ग व माणूस यांचा शोध घेत असताना ती वेदना कोणाही एकट्याची न राहता सार्वत्रिक होत जाते. कधी उपहासगर्भ शैली तर कधी मुक्तशैलीचा उपयोग केलेला आहे. ‘मी धात्री मी धरित्री’ हा काव्यसंग्रह म्हणजे आपल्याला जन्म दिलेल्या मातीची आत्मकथा आहे. या किावता जीवनातली निराशा, अपेक्षाभंग, मूल्यहीनता, व्यावहारिकता, भ्रष्टाचार या कारणांमुळे मनाला होणार्या वेदना मांडल्या आहेत. ‘गोकुळवाटा’ हा काव्यसंग्रह एक गीतमालिका असून तीमध्ये राधाकृष्णाच्या नात्यातील गूढ समजून घेण्याचा ध्यास आहे. ‘जन्मझुला’ या कविता संग्रहातील कविता मानवाच्या अंगभूत दुर्बलतेचा, असहाय्यतेचा, अनिकतत्त्वाचा आणि परात्मभावाचा वेध घेते. मानवाभोवती असणार्या परिस्थितीवर त्यांचे कसलेही नियंत्रण नाही. त्याच्या ठिकाणी जगण्याची तीव्र प्रेरणा असली तरी आणि त्याला हव्या असणार्या जीवनाची स्वप्ने जरी तो पाहत असला तरी त्याचे जगणे आणि स्वप्नपूर्ती त्याच्या हातात नाही. माणसाला मिळालेला जन्म ही त्याने घातलेली भीकच आणि ‘तूच मांडियेला पट । मी तो केवळ सोंगटी । जसे पडेल गा दान । तसे हालणे शेवटी’ हीच माणसाची नियती. अशा परिस्थितीत मग शेवटी ‘श्र्वासाचे हे देणे जोवरा । तोवर जगत रहावे’ एवढेच माणसाच्या हातात उरते.
मृत्यूसंबंधीची एक प्रगल्भ जाणीव तांबोळी यांच्या कवितेत व्यक्त झाली आहे. ही कविता मृत्यूभयाने ग्रासलेली नसून ती मृत्यूच्या अटळ वास्तवाचा समजूतदारपणे स्वीकार करते. ‘झाली जन्माचीच पोथी । तीची समाप्ती : मरण ॥’या रुपात ती मरणाकडे पाहते. तसेच मानवी जगण्यातील निरर्थकत्वाची आणि उद्देशविहिनतेची विदारक जाणीव या कवितेतून प्रकट करते. त्यांच्या या जाणिवांची अभिव्यक्ती ‘घर’, ‘गाव’, ‘वाटा’ आणि ‘चालणे’, या सूत्रप्रतिमांमधून होताना दिसते. माणसाला स्वत:चे ‘घर’ नाही, स्वत:चे ‘गाव’नाही, आयुष्यभर परदेशीपणा भोगणार्या या माणसाला केवळ ‘वाटां’चीच संगत आहे. ‘ग्रीष्म’, ‘वैशाख वणवा’ या दोन सूत्रप्रतिमांमधून माणसाचे हे 'नुसत्या' आणि परनियंत्रित जगण्यातील होरपळ येते. ‘पाऊस’ हा हव्या असणार्या आणि सर्जनशील जगण्याची सूत्रप्रतिमा आहे. अशा पावसाला कविता आव्हान करते. तरी पाऊस येत नाही. अशा वेळची असहाय्यता कवितेतून येते. आध्यात्मिकतेचा आधार कवितेला असल्यामुळे परात्मभावाची जाणीव, भारतीय आध्यात्माशी जोडुन येते.
‘तवंग’ (१९६८), ‘सलाम साब’ (१९८१) हे कथासंग्रह. ‘दूर गेलेले घर’ (१९७०), ‘कृष्णकमळ’ (१९७५), ‘अंबा’ (१९७८), ‘गंधकाली’ (१९७९) ह्या कादंबर्या. ‘दूर गेलेले घर’ ही पहिली कादंबरी. एका बाजूला देव, धर्म, आध्यात्म या वरील श्रद्धा तर दुसर्या बाजूला सर्व काही तर्काच्या निकषांवर पारखू पाहणारी बुद्धी हा सनातन संघर्ष या कादंबरीतून येतो. अवघडलेपण हा या कादंबरीचा विषय आहे. या कादंबरीचा नायक प्रल्हाद, त्याला संभ्रमित करणारा बुद्धिवाद याचे प्रत्ययकारी चित्रण, बारावर्षानंतर गावाकडे आलेला प्रल्हाद परत मुंबईकड जातो. त्याचे येणे आणि जाणे यामधला अवकाश ज्या आठवणींनी व्यक्त होतो. तो पकडणे हा कादंबरीचा हेतू आहे. मराठवाड्यातील एक पडझडता डगमगता धर्ममठ हे या कादंबरीचे केंद्र आहे. सात पिढयांचे संताबुवा महाराज घराणे हा या कादंबरीचा कालपट. दीर्घ असूनही कादंबरीत तो अटोपशीर आला आहे. श्रद्धेची अस्तित्वाला चिकटलेली नाळ तोडते वेळी होणारा मनाचा संघर्ष येतो. ‘कृष्णकमळ’ मध्ये अगतिक, हतबल झालेल्या स्त्रीची वेदना चित्रित केली असून, ‘अंबा’ व ‘गंधकाली' यामधून पौराणिक पात्रांच्या वृत्ति - प्रवृत्तीचा शोध घेतला आहे.
‘कबिराचा शेला’ (१९९६), ‘सय सावल्या’ (२००६), ‘झिरपा’ (२००८) ललितलेख संग्रह. वेगवेगळ्या प्रसंगी वृत्तपत्र, नियतकाल यामधून लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे. ‘कबिराचा शेला’ हे आत्मनिष्ठ, काव्यात्म, भावनेची डूब असलेले, अंतमुर्ख करणारे ललित लेखन आहे. ‘सय सावल्या’ मध्ये राम शेवाळकर, धुंडामहाराज देगलूरकर, वा. ल. कुलकर्णी, ए. वी. जोशी, अनंत भालेराव इत्यादींच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
‘काव्यवृत्ती आणि प्रवृत्ती’ (१९९३), ‘संकीर्ण : मार्ग हा सुखाचा’ (२००६), ‘काव्यवृत्ती आणि प्रवृत्ती’कवितेनेच कवीतेशी केलेला हा संवाद. रुढ समीक्षेपेक्षा आस्वादक समीक्षेच्या वळणाने झालेले हे लेखन आहे. ज्ञानेश्वर आणि तुकाराम या दोन डोळ्यांनी कवितेचा प्रदेश न्याहाळणारी अभिजात रसिकता इथे अधिष्ठान मांडुन बसलेली आहे. कवितेतील भावसौंदर्याप्रमाणे समीक्षेतील विचारसौंदर्य देखील मनमोकळे, प्रांजळ व निर्मळ असे हे चिंतन आहे.
लक्ष्मीकांत तांबोळी यांना उत्कृष्ट वाड्.मयनिर्मितीसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९७०), नरहर कुरुंदकर पुरस्कार (२००५), यशवंतराव चव्हाण पुरस्कार आणि महाकवी विष्णुदास पुरस्कार (२००८), कुसुमताई चव्हाण पुरस्कार (२०१०), सूर्योदय पुरस्कार (२०१०) मिळाले आहेत. तसेच कविता व कथा यांचे इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू भाषांमधून अनुवाद प्रसिद्ध झाले. ‘कृष्णकमळ’ या कादंबरीवर ‘बंदिवान मी संसारी’हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘मराठवाडा गौरव गीत’ सिद्धार्थ उद्यान (औरंगाबाद) व विसावा उद्यान (नांदेड) येथे स्तंभावर शिल्पांकित करण्यात आले. तसेच कविता उद्यान ज्योतिनगर औरंगाबाद येथे ‘दयाळा येवढे द्यावे’ ही कविता शिल्पांकित करण्यात आली.
Comments
Post a Comment